वैजापूर - हरणाची शिकार करुन वस्तीवर झणझणीत मेजवानीचा बेत आखण्याची जोरदार तयारी करणा-या पाच जणांचा वीरगाव पोलीस पथकानेअचानक छापा टाकल्याने मेजवानीचा हिरमोड झाला.पोलीस पथकाने टाकलेल्या छाप्यात मेजवानीसाठी हत्या केलेल्या हरणाचे मांस जप्त करुन दोन जणांना या प्रकरणी ताब्यात घेतले.
तालुक्यातील हनुमंतगाव शिवारातील ञिभुवन वस्ती येथे (दि. ११) गुरुवारी सायंकाळच्या सुमारास काही तरुण हरणाचे मांस पार्टीसाठी कापत असल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.याची माहिती वीरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष बो-हाडे यांना कळल्या नंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक ए.जी.नागटिळक, हवालदार खंडू मोरे, दिपक बर्डे, गणेश जाधव यांच्या पथकाने भेट देऊन तपासणी केली असता त्या ठिकाणी हरणाचे मांस कापून पडलेल्या अवस्थेत आढळून आले.दरम्यान, पोलीस आल्याने मेजवानीची जय्यत तयारी करणा-या पाच जणांपैकी वीरगाव पोलीसांनी संजय बाबुराव ञिभुवन, गुलाब बाळासाहेब फुलारे या दोघांना ताब्यात घेतले. तर नानासाहेब सोपान परडे, सचिन अशोक ञिभुवन, रवी एकनाथ ञिभुवन हे तिघे पसार झाले.
दरम्यान, वनपरिक्षेत्र विभागाचे वनरक्षक बाळासाहेब चव्हाण घटनास्थळी दाखल झाले असून मृत हरणाचा पंचनामा त्यांनी सुरु केला राञी उशिरापर्यंत या प्रकरणी वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती.हे दोन आरोपी वन विभागाचे अधिकारी यांनी ताब्यात आहे.